प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या दहशतीने शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले आहेत. तुळजापूर शहरापासून अगदी जवळील सिंदफळ,आमृतवाडी परिसरात वाघाचे वारंवार दर्शन होत असून, गेल्या दोन दिवसांत तीन ते चार वासरांचा सुपाडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतात काम करताना वाघ जवळ असल्याची चाहूल लागल्याने त्यांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. "आम्ही शेतात जाऊ की नाही, हा प्रश्न पडला आहे," असे अनेक शेतकरी सांगत आहेत.
वनविभागाच्या निष्काळजीपणाबद्दल शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे मानवी जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तात्काळ वाघ जेरबंद करण्यात यावा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्याच्या या काळात आधीच पिकांवर संकट ओढावलेले असताना, वाघाच्या धुमाकुळामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर समाजसेवक मनोज जाधव आक्रमक झाले असून, "वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडू," असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे.
0 टिप्पण्या