Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना लोकसभा युवा प्रमुख आनंद पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी – लोहाऱ्यात बस डेपो तातडीने उभारावा

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : उमरगा तालुक्याचे विभाजन होऊन 27 जून 1999 रोजी लोहारा हा नवीन तालुका अस्तित्वात आला असला तरी आजही दळणवळणाच्या सुविधांच्या बाबतीत हा तालुका मागे आहे. तब्बल 1 लाख 60 हजार लोकसंख्या व 1 लाख 10 हजार मतदार असलेल्या लोहारा तालुक्यात प्रशासकीय कार्यालये स्थापन झाली, मात्र प्रवाशांना दिलासा देणारा बस डेपो अद्यापही उभारण्यात आलेला नाही.


जीवनराव गोरे हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार निधी व महामंडळाच्या सहाय्याने सुमारे 85 लाख रुपयांचा खर्च करून बसस्थानक उभारण्यात आले होते. मात्र वाढत्या प्रवासी ताणामुळे हे स्थानक अपुरे ठरत असून प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत.


लोहारा हा तालुका तुळजापूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तसेच शेजारीच लातूरसारखी मोठी बाजारपेठ असल्यामुळे व्यापार, शिक्षण व उद्योगधंद्यांसाठी विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ कायम असते. महिलाही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने प्रवास करतात. तरीसुद्धा आजही प्रवाशांना असुविधा भोगावी लागत आहे.


सध्या लोहाऱ्यात बसस्थानक असले तरी डेपो नाही. त्यामुळे येथून सुटणाऱ्या गाड्या बाहेरच्या डिपोंवर अवलंबून आहेत. लोहाऱ्यात प्रशस्त चार एकर जागा उपलब्ध असून येथे किमान 50 बसांची सोय करून डेपो उभारल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करून परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालून लोहाऱ्यात बस डेपो उभारावा, अशी मागणी शिवसेना लोकसभा युवा अध्यक्ष आनंद पाटील यांनी धाराशिव दौऱ्यात पालकमंत्र्यांकडे केली आहे.


स्थानिक प्रवासी व नागरिकांनीही याबाबत तीव्र भावना व्यक्त करून प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या