प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव – मेडसिंगा गावचा सुपुत्र धीरज ज्ञानोबा जाधव याची सरळ सेवेमधून जलसंपदा विभागाअंतर्गत राहुरी येथील पाटबंधारे विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांमध्ये व मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या सन्मानार्थ नुकताच भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
हा सत्कार सोहळा श्री व सौ. मंगल बलभीम कदम व पुष्पक गृह निर्माण सोसायटी, बालाजी नगर (शेकापूर रोड) येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी धीरज जाधव यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून धीरज यांच्या यशाचे कौतुक करत भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतात धीरज जाधव म्हणाले, "हा यशाचा प्रवास माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे, कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आणि मित्रपरिवाराच्या प्रोत्साहनामुळे शक्य झाला आहे. आता शासनाच्या सेवेत राहून प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा माझा संकल्प आहे."
कार्यक्रमाला बालाजी नगर परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व जाधव कुटुंबाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिषेक तुकाराम जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मित्रपरिवाराच्यावतीने करण्यात आले.
याच कार्यक्रमात गावातील प्राथमिक शिक्षक श्री. खिल्लारे मधुकर रंगनाथ व माध्यमिक शिक्षक श्री. दत्तात्रय भीमराव आगळे यांचा वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त जाधव बंधू ज्ञानोबा व तुकाराम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील युवकांनी मेहनत व चिकाटीच्या जोरावर राज्यसेवेत स्थान मिळविले, हा अभिमान व्यक्त करत सर्वत्र या नागरी सत्काराची चर्चा होत आहे. या सोहळ्यातून नवयुवकांना प्रेरणा मिळून तेही शिक्षण व परिश्रमाच्या जोरावर मोठ्या पदावर भरारी घेतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या