Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव मध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर;जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचा धडक राजीनामा

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदावर मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी आपल्या पदाचा (दि.०३) जुलै रोजी धडक राजीनामा दिला असून, या राजीनाम्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुरगुडे यांचा अचानक राजीनामा देणे हे राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्वाचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास निधी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे वाटप हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे, सन्मानपूर्वक होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या भावना त्यांनी स्पष्टपणे मांडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.


या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे २१ जुलै रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनामावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.आता धुरगुडे यांची नाराजगी पक्षश्रेष्ठी कश्या पध्दतीने दुर करणार हे पाहावे लागणार आहे.




धुरगुडे यांच्या राजीनाम्यामुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेषतः कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर उंचावत चालल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरू शकते.


दरम्यान, अजित पवार गटाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, सुनील तटकरे यांच्या दौऱ्यादरम्यान ही परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या