प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव-तुळजापूर–सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी लागणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. मात्र या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये मोबदल्याच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक नागरिक व शेतकरी हे शासनाने निश्चित केलेल्या मूल्यांकनाच्या तुलनेत कमी मोबदला मिळाल्याने संतप्त झाले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
तुळजापूर शहरालगत असलेल्या प्लॉटधारकांनी बाजार भावानुसार आणि सरकारी व्हॅल्युएशनच्या दरानुसार दीड ते दोन लाख रुपये किव्हा त्यापेक्षा जास्त रुपये गुंठा या दराने प्लॉट खरेदी केले होते. मात्र रेल्वे मार्ग या जागेतून गेल्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना फक्त 60,000 रुपये गुंठा इतकाच मोबदला दिला जात आहे. यामुळे संबंधित नागरिकांनी ती जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. काही भागांमध्ये प्लॉट 1 लाख रुपये प्रति गुंठा दराने खरेदी करण्यात आले होते. मात्र शासनाकडून फक्त 40,000 रुपये गुंठा दराने मोबदला दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात दिल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अधिग्रहणाच्या वेळी शासनाने अधिकृतपणे "शासनाच्या मूल्यांकनाच्या सहापट मोबदला दिला जाईल" अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात मिळणारा मोबदला व्हॅल्युएशनपेक्षा खूपच कमी आहे, हे लक्षात आल्यावर नागरिकांमध्ये भ्रम आणि रोष निर्माण झाला आहे.
या परिस्थितीमुळे धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी जागा न दिल्यास प्रकल्प थांबू शकतो. त्यामुळे आता या प्रकरणात शासन कसा तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांची मागणी आहे की, त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार व सरकारच्या वचनानुसार मिळावा. अन्यथा पुढील काळात आंदोलनाची हाक देण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे धाराशिव-तुळजापूर-सोलापूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने नागरिकांच्या भावना समजून घेत तातडीने या मोबदल्याच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अन्यथा हा गोंधळ प्रकल्पाच्या गतीला अडथळा ठरू शकतो.

0 टिप्पण्या