Ticker

6/recent/ticker-posts

केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही तर त्याचे संगोपन अत्यंत महत्वाचे : जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : जिल्हयात वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. जिल्हयात पर्यावरणाच्या दृष्टीने वनाच्छादित क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे.या पावसाळयात जिल्हयात ५० लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.तर १९ जुलै रोजी जिल्हा प्रशासन उत्स्फूर्त लोकसहभागातून १५ लक्ष वृक्ष लागवड करणार आहे. आपल्याला केवळ वृक्ष लागवडच करून चालणार नाही तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करून त्याला वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे.असे मत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केले.


आज ३० जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील जिल्हा नियेाजन समिती सभागृहात आयोजित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या आढावा बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, विभागीय वनअधिकारी बी.के.पोळ, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्याम गोडभरले, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,वैशाली पाटील व संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


श्री.पुजार म्हणाले की,येत्या १९ जुलै रोजी होणाऱ्या १५ लक्ष वृक्षलागवडीची यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनातून पूर्व तयारी करावी.वृक्ष लागवडीसाठी लोकसहभागाची यादी अद्ययावत असावी.ज्या ठिकाणी १९ जुलै रोजी मियावाकी पध्दतीने घनवन पध्दतीने वृक्षलागवड करण्यात येणार आहे,त्या जमिनीची मशागत केलेली असावी.आवश्यक साहित्य वृक्ष लागवडीच्या ठिकाणी उपलब्ध असावे.रोपांची वाहतूक वृक्ष लागवडीच्या ठिकाणी वेळेत करावी.१ जुलै रोजी वृक्ष लागवडीसाठी विशेष ग्रामसभेचे आयेाजन करावे.वृक्ष लागवडीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती ग्रामसभेत दयावी. वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे स्वयंघोषणापत्र लिहून घ्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.


डॉ.घोष म्हणाले.ग्रामीण भागात वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा.ज्या ग्रामपंचायती घनवन वृक्षलागवड करणार आहे.त्या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून वृक्षलागवडीसोबत वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्विकारावी.


श्री.धरमकर म्हणाले की,५० लक्ष वृक्ष लागवडीत नागरीकांचा उत्स्फुर्त लोकसहभाग असला पाहिजे.१९ जुलै रोजी १५ लक्ष वृक्ष लागवड करून एक नवीन विक्रम तयार करायचा आहे.घनवन पध्दतीने १० आर जागेत ३ हजार वेगवेगळया प्रजातीची वृक्ष लागवड करावयाची आहे.ग्रामीण व शहरी भागात वृक्ष लागवडीसाठी हरीतमित्र आजच उपलब्ध करून घ्यावे.१९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता वृक्ष लागवड ज्या ज्या ठिकाणी होणार आहे,त्या-त्या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहावे.सकाळी ७ वाजता चहापाणी व उपस्थितांची हजेरी घेण्यात येईल. वृक्षारोपणाची शपथ घेण्यात येईल. राष्ट्रगीत,राज्यगीत होईल व त्यानंतर सकाळी ७.३० वाजता वृक्षारोपणास सुरूवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच १० नगर पालीकांच्या मुख्याधिकारी यांनी त्यांच्या शहरी क्षेत्रात १९ जुलै रोजी व या पावसाळयात करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीची माहिती दिली. तहसिलदार,गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी देखील वृक्ष लागवडीच्या तयारीची माहिती यावेळी दिली.


सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या