प्रतिनिधी : अशोक गरड
औसा : मौजे बिरवली (तालुका औसा) येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित गृहनिर्माण अभियंता व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती औसा यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बिरवली गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून सुमारे 200 घरकुलांचे काम सुरू असून, या कामांचे बिल काढण्यासाठी संबंधित अभियंता यांनी लाभार्थ्यांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भातील ठोस पुरावे संबंधित पक्षाकडे असून, त्याचे सादरीकरणही करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, जेणेकरून इतर भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा मिळेल व शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होईल, अशी जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे औसा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ आनंदगावकर व सयाजी पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या प्रकरणाकडे गटविकास अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून चौकशी सुरू करावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


0 टिप्पण्या