प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्हा प्रशासनाने एक ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक पाऊल उचलत “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी २० लाख झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. या धाडसी मोहिमेसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे अधिकृत अर्जही करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या उपक्रमावर केंद्रित झाले आहे.
या वृक्षारोपण मोहिमेचा उद्देश केवळ पर्यावरण संवर्धन नव्हे, तर धाराशिवच्या नावाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक हरित जिल्हा म्हणून अधोरेखित करणे हा देखील आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची आखणी करण्यात आली असून, प्रशासनाने संपूर्ण जिल्हा यंत्रणेला या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे.
जिल्हाधिकारी पुजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही मोहीम एक सामूहिक जबाबदारी आहे. आपण जसे निवडणूक प्रक्रिया अथवा आपत्ती व्यवस्थापनात एकदिलाने काम करतो, त्याच आत्मीयतेने आणि जोमाने ‘हरित धाराशिव’ उपक्रमाकडेही पाहावे. हे केवळ झाडे लावणे नाही, तर भविष्यासाठी एक हिरवे स्वप्न साकार करण्याची प्रक्रिया आहे.”
मोहिमेची वैशिष्ट्ये:
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज: एका दिवसात सर्वाधिक झाडे लावण्याचा विक्रम करण्याचा मानस.
२० लाख झाडांची लागवड: संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ठिकाणी एकत्रित वृक्षारोपण.
सर्व विभागांची जबाबदारी: महसूल, शिक्षण, कृषी, वन, ग्रामविकास, आरोग्य अशा विविध विभागांचे समन्वयाने काम.
जनतेचा सहभाग: शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, स्थानिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचा सक्रीय सहभाग.
उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय समन्वय बैठक आणि व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजिली जाणार आहे. या बैठकीत प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या ठरवून, मोहिमेची अंमलबजावणीची रूपरेषा निश्चित केली जाईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होऊन, आपण धाराशिव जिल्ह्याला पर्यावरण पूरक, हरित आणि आदर्श जिल्हा बनवण्यासाठी योगदान द्यावे.”
हरित धाराशिव अभियान ही एक जिल्हास्तरीय लोकचळवळ होण्याची क्षमता असलेली मोहीम आहे. प्रशासन, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांची एकजूट हीच या मोहिमेची खरी ताकद ठरणार आहे. १९ जुलै २०२५ रोजी आपण सर्वांनी एकत्र येऊन, इतिहास घडवायचा आहे — आणि एक हिरवे भवितव्य निर्माण करायचे आहे.
0 टिप्पण्या