प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:जिल्ह्यातील वाशी तालुक्यात अवैध, अनधिकृत आणि विनापरवाना खत साठा आढळून आल्याने मोठी कारवाई करण्यात आली. एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये लपवून ठेवण्यात आलेले एकूण ४५६ पोते (सुमारे २० मेट्रिक टन) रासायनिक खत साठा आढळून आला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, एकूण ४.६१ लाख रुपये किमतीचा खतसाठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषि संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर साहेबराव दिवेकर आणि मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आणि कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिस, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सदर प्रकरणी गुन्ह्याची फिर्याद तालुका कृषी अधिकारी वाशी राजाराम बर्वे यांनी दिली. या कारवाईमध्ये मोहिम अधिकारी डी. ए. गरगडे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), प्रवीण पाटील (कृषी अधिकारी, पंचायत समिती वाशी), अविनाश माळी (कृषी अधिकारी), विस्तार अधिकारी श्रीकांत साळवे, गायकवाड व साखरे (तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वाशी) सहभागी होते.
सदर मोहिमेसाठी तांत्रिक मार्गदर्शन तंत्र अधिकारी गु.नि. लातूर येथील प्रवीण विठ्ठल भोर यांनी केले.
या कारवाईमुळे बोगस आणि विनापरवाना खत साठ्यावर आळा बसण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने प्रशासनाची कारवाई उल्लेखनीय ठरत आहे.

0 टिप्पण्या