प्रतिनिधी : अशोक गरड
औसा : ग्रामपंचायत कार्यालय बेलकुंड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री. विष्णू कोळी होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. समाधान कांबळे, प्रमोद पवार, तंटामुक्ती अध्यक्ष लहू पवार, पोलीस पाटील व्यंकट साळुंखे, नानासाहेब निकते, अशोक जाधव यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले. संभाजी महाराजांचे राष्ट्रनिष्ठ, शौर्यवान व बुद्धिमान नेतृत्व आजच्या तरुण पिढीला आदर्श ठरावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांचे प्रेरणादायी भाषण यामुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारले होते.

0 टिप्पण्या