Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात 3 जून 2025 पर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या उड्डाण साधनांवर बंदी; NO FLYING ZONE जाहीर

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव – राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तातडीने NO FLYING ZONE जाहीर करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने अलीकडेच राबवलेल्या "ऑपरेशन सिंदुर" मोहिमेमुळे जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तय्यबा (LET) आणि हिजबुल मुजाहिद्दीन (HM) या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून ड्रोन हल्ल्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.


या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संपूर्ण जिल्ह्यात ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार, अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत अधिकार वापरून तातडीने आदेश निर्गमित केला आहे.


या आदेशानुसार दि. 03 जून 2025 पर्यंत धाराशिव जिल्ह्यात पुढील साधनांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे:


ड्रोन


रिमोट कंट्रोल मायक्रो एअरक्राफ्ट


पॅरा ग्लायडर्स


हँग ग्लायडर्स


हॉट एअर बलून


तत्सम हवेत तरंगणाऱ्या इतर वस्तू



हा आदेश तातडीने व एकतर्फी स्वरूपात निर्गमित करण्यात आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही नोटीस न देता लागू करण्यात आलेला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या