प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव – स्वस्तिक मंगल कार्यालय येथे श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि फिजिक्स वाला या ख्यातनाम शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य सत्कार समारंभ व 'फिजिक्स वाला' क्लासचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात गुरूवर्य कै. के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी २०२४ सालच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल सादर करताना शाळेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली.
प्रास्ताविक करताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी संस्थेच्या १९६२ पासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी 'फिजिक्स वाला' सारख्या नामांकित संस्थेच्या सहकार्याने कोटा किंवा दिल्लीला न जाता स्थानिक स्तरावर नीट व जेईई परीक्षांची तयारी करण्याचा सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे सांगितले. “धाराशिव पॅटर्न” तयार करून जिल्ह्याला शैक्षणिक क्षेत्रात नवा आयाम देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत 'फिजिक्स वाला' उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तहसीलदार मृणाल जाधव यांनी अपयशाला न घाबरता यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
फिजिक्स वाला संस्थेचे अजय चौहान यांनी संस्थेची कार्यपद्धती, क्लासरूम लर्निंग, ऑनलाईन ॲप्स, स्टडी मटेरियल व शिक्षकांचे योगदान या सर्व बाबींचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे खरे कारण मानले.
या कार्यक्रमात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या १७३ विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्यालयातील कु. श्रावणी जयप्रकाश पवार व श्रेयस लालासाहेब पवार या विद्यार्थ्यांनी १००% गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्वल केले. जिल्ह्यातील इतर शाळांतील गुणवंत – पृथ्वीराज भागवत पाटील, गोसावी आसावरी अशोक, अडसूळ कृष्णा विलास, गोरे अक्षरा धनंजय, लटके भाग्यश्री ज्ञानेश्वर या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
तसेच फ्लाईंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमधील सीबीएसई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात फिजिक्स वाला ऑफलाईन क्लासेसचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यामध्ये इयत्ता आठवी ते बारावी साठी कोर्सेस उपलब्ध असून विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षांची दर्जेदार तयारी करता येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये –
पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव
अध्यक्ष सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ
सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील
तहसीलदार मृणाल जाधव
उपशिक्षणाधिकारी लांडगे साहेब
फिजिक्स वाला संस्थेचे अकुंश रुपेला (स्कूल पार्टनरशिप बिझनेस ऑपरेशन हेड), शुभम दुबे व प्रवीण अग्निहोत्री यांचा समावेश होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. एस. के. कापसे व एस. सी. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी केले.
या संपूर्ण सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाने धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला एक नवा टप्पा गाठल्याचे प्रतीत झाले.



0 टिप्पण्या