प्रतिनिधी :जुबेर शेख
मुंबई – महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना वेगवान आणि प्रभावी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे OSD मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाची जबाबदारी पार पडणार आहे.
काल मंत्रालयात मोठ्या उत्साहात या कक्षाच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर आणि विधी व न्याय राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या शुभहस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास अनेक मान्यवर, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
वैद्यकीय मदत कक्षाची उद्दिष्टे:
हा कक्ष गरजू रुग्णांना तातडीने आणि प्रभावीपणे मदत करण्यासाठी कार्यरत असेल. महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास, त्यांना तातडीने मदतीचा हात देण्याचे हे केंद्र एक प्रभावी साधन ठरणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी आवश्यक ती मदत पुरवली जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता – एका आईसाठी आधारवड
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा आणखी एक प्रत्यय नुकताच महाराष्ट्राने पाहिला. तीन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई येथे घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोनाली अक्षय चव्हाण या माऊलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या केवळ तीन वर्षांच्या चिमुकल्याला दोरीने दगडाला बांधून ती मोलमजुरी करत असल्याचे पाहायला मिळाले. हा दृश्य मन हेलावणारे होते. या प्रसंगाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच, त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.
तपासाअंती असे स्पष्ट झाले की या चिमुकल्याला जन्मतः ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता नाही. या दुर्दैवी वास्तवाची जाणीव होताच, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या OSD मंगेश चिवटे यांना तातडीने या मुलाच्या संपूर्ण उपचार खर्चाची जबाबदारी उचलण्याचे निर्देश दिले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने घेतली जबाबदारी
त्यानुसार, या चिमुकल्याच्या पालकांना ठाण्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तिथे त्यांना उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यात आली. आता हा चिमुकला पुन्हा ऐकू आणि बोलू शकेल, यासाठी लागणाऱ्या सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जनतेसाठी नवीन आशा किरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला वैद्यकीय मदत कक्ष राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आशास्थान ठरणार आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी हे केंद्र कार्यरत राहणार असून, आरोग्य सुविधांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
नवीन आरोग्य योजनेसाठी नागरिकांची मोठी अपेक्षा
या कक्षाच्या माध्यमातून भविष्यात आणखी प्रभावी योजनांची अंमलबजावणी होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गरजूंना वेळीच आणि विनाअडथळा वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एकनाथ शिंदे यांचा सामाजिक बांधिलकीचा आणि संवेदनशीलतेचा दृष्टिकोन महाराष्ट्रासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
0 टिप्पण्या