Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त सैनिक सय्यद अलाउद्दीन यांचा वर्गमित्रांतर्फे भव्य सत्कार


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : भारतीय सैन्यात अभिमानास्पद सेवा बजावल्यानंतर तुळजापूरचे सुपुत्र सय्यद अलाउद्दीन हे सेवानिवृत्त झाले. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर दिनांक १ फेब्रुवारी रोजी त्यांनी सैन्य दलातून सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली. सेवानिवृत्तीनंतर मायभूमीत परतल्यावर त्यांच्या दहावी १९९० बॅचच्या वर्गमित्रांनी त्यांचा उत्साहात सत्कार केला.

तुळजापूर येथील विश्रामगृहात आयोजित या सोहळ्यात सय्यद अलाउद्दीन यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपस्थित सर्व मित्रांनी आपल्या या वीर सैनिकाच्या देशसेवेचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मित्रांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला आणि जुन्या मित्रासोबतचे क्षण पुन्हा एकदा अनुभवले.

सय्यद अलाउद्दीन यांनी आपल्या मनोगतातून सैन्यातील अनुभव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि त्यातून मिळालेल्या शिकवणींवर प्रकाश टाकला. पुढील जीवन समाजसेवेसाठी व मित्रांसाठी अधिकाधिक वेळ देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या आश्वासनाने उपस्थित सर्व मित्र भारावून गेले आणि या पुनर्मिलनाचा आनंद द्विगुणित झाला.

या सोहळ्यासाठी वर्गमित्र शिवाजीराव मोरे, संतोष भैय्या साळुंखे, फिरोज पठाण, बाळासाहेब जाधव, बंडू बैरागी, दिगंबर हुंडेकरी, संजय केवडकर, दादासाहेब ननवरे, नानासाहेब पेंदे, धनंजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सत्कार सोहळा एका अविस्मरणीय आठवणीत रूपांतरित झाला. सर्व मित्रांनी भविष्यातही अशाच प्रकारे एकत्र येण्याचा संकल्प केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या