प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:शहरातील जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात मूकबधीर तरुणास हातपाय बांधून काठीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. “तु आमच्या भागात का आलास” असे म्हणत पाच जणांनी हा अमानुष प्रकार केल्याचा आरोप जखमी तरुणाच्या नातेवाइकांनी केला असून,या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेत राजेश श्रीमंत पवार (वय ३२, रा. घाटशिळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.राजेश हा लहानपणापासून मूकबधीर असून,सध्या त्याच्यावर तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी कांताबाई अभिमान चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी राजेश यास मारहाण होत असल्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर त्या कुटुंबीयांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मात्र तेथे पोहोचताच अत्यंत संतापजनक दृश्य दिसून आले.राजेशचे दोन्ही हात बांधून त्याच्या डोक्यावर, तोंडावर, छाती, बरगड्या तसेच गुप्तांगावर काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू होती.
नातेवाइकांनी मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच “पुन्हा आमच्या भागात दिसला तर जिवे मारू” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुरज हरिश्चंद्र जगदाळे,प्रतिक जगदाळे,गणेश जगदाळे,राजाभाऊ देशमाने,शंतनू नरवडे (सर्व रा. तुळजापूर खुर्द) यांच्यासह अन्य काही व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.
घटनेनंतर जखमी राजेश पवार यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
मूकबधीर तरुणावर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे तुळजापूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून होत आहे. दिव्यांग व्यक्तींवरील वाढत्या अत्याचारांबाबतही या घटनेमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

0 टिप्पण्या