Ticker

6/recent/ticker-posts

नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुका : राज्य निवडणूक आयोगाचे नामनिर्देशन प्रक्रियेवर नवे कडक निर्देश

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:महाराष्ट्रातील २८६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. मुंबई येथील नवी प्रशासनिक इमारत, हुतात्मा राजगुरू चौक येथून १८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी तसेच मुंबई शहर व उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.


राज्य निवडणूक आयोगाचे सचिव तथा उपआयुक्त राजेंद्र पाटील यांनी जारी केलेल्या पत्रानुसार,१७ नोव्हेंबर २०२४ रोजी देण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रातील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतच्या काही तरतुदी रद्द करण्यात आल्या असून, सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.


पत्रात नमूद करण्यात आले आहे की,नॉन-नोटिफाईड राजकीय पक्षाच्या वतीने सादर केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जावर,त्यांच्या उमेदवारीला आधार देणारा अधिकृत सूचक (Proposer) नसल्यास किंवा सूचकाची माहिती अपूर्ण असल्यास, उमेदवाराचा अर्ज अवैध मानण्यात यावा.


तसेच, उमेदवाराने जर स्वखर्चाने किंवा स्वतंत्र सूचकाच्या सहीसह योग्य प्रकारे नामनिर्देशन अर्ज सादर केला असेल, आणि त्या अर्जात आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली असेल, तरच तो अर्ज वैध मानला जाईल.


राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की,सूचकाची सही नसलेला,सूचकाच्या तपशीलांची कमतरता असलेला,किंवा नॉन-नोटिफाईड पक्षाच्या उमेदवाराने अधिकृत सूचक न देता केलेला अर्ज थेट 'अवैध' मानून बाद करावा.


राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की,सुधारित नियमावलीनुसार नामनिर्देशन अर्जांची छाननी करताना कोणतीही शंका राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. पात्र असलेल्या अर्जांनाच वैधता द्यावी आणि अपूर्ण/कायदेशीर त्रुटी असलेले अर्ज तत्काळ बाद करावेत.


या निर्णयामुळे पुढील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमधील नामनिर्देशन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्त अधिक दृढ होणार असून, निवडणूक आयोगाने दाखवलेली ही तातडीची प्रतिक्रिया उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या