प्रतिनिधी : अशोक गरड
औसा : औसा तालुक्यातील मौजे मासुर्डे येथील शेतकरी अविनाश विजयसिंह तोवर यांच्या शेतीसह घराचे मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अलीकडील अतिवृष्टीमुळे त्यांच्या सात एकर उडीद पीक पूर्णपणे नष्ट झाले. केवळ शेतीच नव्हे तर त्याच पावसामुळे त्यांच्या घराच्या भिंतीची पडझड होऊन कुटुंबावर संकट कोसळले.
या गंभीर नुकसानीकडे प्रशासनाने सुरुवातीला दुर्लक्ष केले होते. मात्र वीर महाराष्ट्र न्यूजने हा विषय ठळकपणे मांडताच प्रशासन हडबडून जागे झाले. त्यानंतर मासुर्डे गावाचे तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यासोबतच झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
तोवर यांना भेडसावणाऱ्या या संकटामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा संताप होता. पण वीर महाराष्ट्र न्यूजने घेतलेल्या पुढाकारामुळे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव झाली व न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे मासुर्डे गावातील शेतकरी वर्गाने वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे आभार मानले असून, “माध्यमांच्या शक्तीमुळे आज आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, शेतकरी पीकहानी व घरभिंतीच्या पडझडीमुळे कर्जबाजारीपणाच्या गर्तेत सापडला असून शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणीही स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
0 टिप्पण्या