Ticker

6/recent/ticker-posts

जांभोरी गावात डोंगर कोसळण्याचा धोका;70 नागरिक सुरक्षित स्थळी हलवले

 

प्रतिनिधी : मिलिंद भांगरे

पुणे : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील जांभोरी गावातील काळेवाडी नं. १ कडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारी डोंगरावरील दगड व माती कोसळली. सध्या परिसरात मुसळधार पावसाचे जोरदार प्रमाण असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.


डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड कोसळल्याने कधीही नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा व ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतली.


घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 70 नागरिक (पुरुष, महिला व लहान मुले) सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नागरिकांना तातडीने जांभोरी ग्रामपंचायत कार्यालय तसेच समाज मंदिर येथे स्थलांतरित करण्यात आले असून, सर्वांची सोय सुरक्षितपणे करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून डोंगर उतार परिसरात नागरिकांनी जाऊ नये, सतर्क राहावे व सुरक्षित स्थळीच थांबावे, असा इशारा दिला आहे. पावसामुळे आणखी कोसळणाऱ्या दगड-मातीचा धोका कायम असल्याने बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.


ग्रामस्थांनी वेळेवर दिलेल्या कळवळीमुळे व पोलीस तसेच महसूल प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे चित्र दिसून आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या