प्रतिनिधी : अशोक गरड
लातूर :-लातूर जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट - सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अनेक महसूल मंडळांत आणि सप्टेंबरमध्ये काही महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदली गेली असून उर्वरित मंडळांतही सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. पिके पूर्णतः पाण्यात बुडाली असून अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेली आहे, काही भागात मानवी जीवितहानी, जनावरांचा मृत्यू आणि घरांची पडझड झाली आहे. अनेक घरामध्ये पाणी जाऊन घराचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
'ओला दुष्काळ' शब्द महसूल नियमावलीत नसला तरी जनतेची भावना आणि शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती लक्षात घ्यावी. 'ओला दुष्काळ' घोषित करून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून दसरा-दिवाळीपूर्वी विशेष उपाययोजना व मदत जाहीर करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात याव्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी मेल द्वारे मा. मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
0 टिप्पण्या