Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा आज अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.


पालकमंत्री सरनाईक आज दुपारी वडगाव (सिद्धेश्वर) येथे दुपारी ४ वाजता आणि तेर येथे सायंकाळी ५ वाजता भेट देऊन शेतकऱ्यांची व नागरिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेणार आहेत. यावेळी ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत व पुनर्वसनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देणार असल्याची माहिती मिळाली आहे.


अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतजमिनींना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांना पाणी शिरले असून रस्ते, पूल, वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांवर देखील परिणाम झाला आहे. शेतकरी व नागरिक यांच्यात भीती व चिंतेचे वातावरण आहे.


पालकमंत्रींच्या या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सर्वस्तरातून मागणी होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या