Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांच्या कार्यकाळात गंभीर भ्रष्टाचार, अनियमितता व नियमबाह्य कृत्ये झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन मार्फत जिल्हाधिकारी धाराशिव यांना पाठविण्यात आले असून, चौकशीसाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव तहसीलदारांनी ‘एन ए लेआउट’ प्रक्रियेत आपल्या पदाचा गैरवापर करून करोडो रुपयांचे महसुली नुकसान केले. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी महसूलमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. महसूलमंत्र्यांनी याबाबत चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली असली, तरी चौकशीची जबाबदारी नांदेड येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली.


निवेदनकर्त्यांच्या मते, संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्वी नांदेड जिल्ह्यात काम केले असल्यामुळे चौकशी निष्पक्ष होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, तपासाची सध्याची गती पाहता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे.


याशिवाय, एका सामाजिक कार्यकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तहसीलदार मृणाल जाधव यांच्या मालकीची १०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या तक्रारीत सविस्तर माहिती सादर करण्यात आली असून, तरीही कार्यवाही प्रलंबित आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, “एखाद्या अधिकाऱ्याची शेकडो कोटींची मालमत्ता असणे ही राज्याच्या प्रशासकीय सेवेला काळिमा फासणारी बाब असून, मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तपास जलद आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा.”


हे निवेदन मनोज दगडू जाधव यांनी सादर केले असून,निवेदनाची प्रत महसूल मंत्री, माजी मंत्री बच्चू कडू, लोकायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विरोधी पक्षनेते, ईडी, विभागीय आयुक्त आणि समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठवण्यात आली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या