प्रतिनिधी : मिलिंद भांगरे
खेड (पुणे) – खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिवमंदिर दर्शनाला जात असलेल्या भाविकांच्या पिकअप जीपचा घाटातील नागमोडी वळणावर भीषण अपघात झाला. यात ८ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पापळवाडी येथील महिला भाविकांचा एक गट सोमवारी सकाळी कुंडेश्वर दर्शनासाठी निघाला होता. घाट परिसरात चढाई करताना पिकअप जीप अचानक रिटर्न होऊन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेल्या वाहनाने ५ ते ६ पलट्या घेत दरीत कोसळत भीषण अपघात घडवला.
अपघातात ८ महिलांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर उर्वरित ३० ते ३५ भाविक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून ब्रेक फेल किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला का याबाबत चौकशी सुरू आहे.
या अपघाताची बातमी कळताच पापळवाडी गावात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांनी शासनाकडे पीडित कुटुंबांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या