प्रतिनिधी : सयाजी पाटील
औसा:“आली रे आली आषाढी एकादशी, झाली सुरुवात चार्तुमासाशी...” या भक्तिपूर्ण ओळींप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरवली येथे आषाढी एकादशी निमित्त “वारी साक्षरतेची” हा विशेष उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत सजून तयार झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात टाळ, मृदंग घेऊन "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" असा गजर करत संपूर्ण गावातून पायी दिंडी काढली. त्यांच्या गजराने व टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हालं. गावकऱ्यांनी देखील या दिंडीचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले.
विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये गावातील भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले, ज्यामुळे कार्यक्रमात पारंपरिकतेची आणि भक्तिभावाची एक वेगळीच रंगत आली. विठ्ठल रखुमाईच्या रूपातील बालगोपाळांनी भक्तीरसात न्हालेल्या स्वरूपात गावातील प्रत्येक गल्ली-गल्लीतून साक्षरतेचा संदेश दिला.
या उपक्रमाचा उद्देश आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात साक्षरतेचे महत्व पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुंढे सर व शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पार पडला.
शाळेतील पालक, गावकरी, व शिक्षक यांनी एकत्र येत हा उपक्रम साजरा केल्याने विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, सामाजिक भावना व परंपरेची ओळख मिळाली.
यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष सयाजी पाटील,उपसरपंच अमित पाटील उपस्थित होते.
"वारी साक्षरतेची" हा उपक्रम शाळा आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट करणारा ठरला.
0 टिप्पण्या