प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याकडे पुरवठा केलेल्या उसाचे पैसे अद्याप न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने संबंधित कारखाना प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे जोरदार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या निवेदनात प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश विष्णु माळी यांनी नमूद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने ऊस पुरवठा केला, परंतु कारखान्याकडून अद्याप पैसे मिळालेले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून काहीजण कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
शेतकऱ्यांचे प्रलंबित ऊस बिले तात्काळ अदा करावीत.
बिल न दिल्यास गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
याची संपूर्ण जबाबदारी कारखाना प्रशासनावर राहील.
निवेदनासोबत महेश बेटकर, गणेश बेटकर, श्री बिडकर, सुधाकर सुरवसे, सोमनाथ बचाटे, विजय सुरवसे, नवनाथ सुरवसे, संभाजी सुरवसे, उमाकांत चेंडके, संदीप कराळे, लक्ष्मण बचाटे, गणेश कोलते, सोमनाथ कसबे या शेतकऱ्यांसह अनेक ऊस उत्पादकांची नावे व स्वाक्षऱ्या जोडण्यात आल्या आहेत.
हे निवेदन मा. चेअरमन, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकडे पाठवण्यात आले असून याची प्रत मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
प्रशासनाकडे शेतकऱ्यांचा ठाम सवाल:
गेल्या काही महिन्यांपासून ऊस गाळप करूनही बिले न मिळणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. जर योग्य वेळी पैसे मिळाले नाहीत, तर संघटनेच्या माध्यमातून लवकरच तीव्र आंदोलन उभं केलं जाईल, असा ठाम इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या