Ticker

6/recent/ticker-posts

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश; शासनाची मागण्यांवर लेखी दखल, चक्काजाम आंदोलन रद्द

प्रतिनिधी : जुबेर शेख 

अमरावती : शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांच्या मानधन वाढी आणि अन्य सामाजिक मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर ठाम होते. त्यांच्या या आंदोलनाची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले आहे.


या पत्रात खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे:


1. शेतकरी कर्जमाफी: पुढील १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल. तसंच थकीत कर्जदारांवरील सध्या सुरू असलेली वसुली तात्काळ स्थगित करण्यात येणार आहे आणि नवीन कर्जवाटपाबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.


2. दिव्यांगांच्या मानधनात वाढ: येत्या ३० जूनपूर्वी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.


3. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा: वरील सर्व मागण्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांसोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे.


शासनाच्या या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपल्या अन्नत्याग आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली असून, उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर करण्यात आलेले चक्काजाम आंदोलनही रद्द करण्यात आले आहे.


मात्र, बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, "जर सरकारने या लेखी आश्वासनाची वेळेत अंमलबजावणी केली नाही, तर येत्या २ ऑक्टोबर रोजी यापेक्षा मोठे व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल."


शासनाच्या या लेखी पावलामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला महत्त्वाचे यश लाभले असून, राज्यातील हजारो शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या