Ticker

6/recent/ticker-posts

टॉवरवरील साहित्य चोरीप्रकरणी उच्चशिक्षित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे इंडस टॉवर कंपनीच्या टॉवर क्रमांक 1069862 वरील एअरटेल कंपनीचा आय वेन डिव्हाइस आणि डिश अँटेना अज्ञात चोरट्याने चोरीला नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक 17 मार्च 2025 रोजी गुन्हा क्रमांक 65/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषणातून संशयित आरोपीचा शोध

धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये टेलिकॉम टॉवरवरील इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरीचे गुन्हे नोंदवले गेले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू करण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हे करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान, आंबेजोगाई तालुका (जि. बीड) येथील एका संशयित व्यक्तीचे नाव समोर आले.

आरोपीची अटक व कबुलीजबाब

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेजोगाई येथे तत्काळ धाड टाकून राजेश आचार्य या संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने यापूर्वी रिकाम कंपनीत इंजिनियर म्हणून काम केल्याची कबुली दिली. मात्र, नोकरी गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्याने पैसे कमवण्यासाठी त्याने धाराशिव जिल्ह्यातील येडशी, सांजा, मार्डी आणि मसला येथे असलेल्या इंडस टॉवरवरील इंटरनेटसाठी उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरी केल्याची कबुली दिली.

सहा उपकरणांची चोरी व पोलिसांची कारवाई

पोलिसांच्या तपासात आरोपीने एकूण सहा उपकरणे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखांची तपासणी केली असता, त्याच्याविरुद्ध याआधी चार गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून एकूण ₹1,65,000 किंमतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल (₹70,000) असा एकूण ₹2,35,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला मुद्देमालासह धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी हजर केले आहे.

पोलीस पथकाची महत्त्वाची भूमिका

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चापोका नितीन भोसले आणि चापोका रत्नदीप डोंगरे यांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या