Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूरमध्ये मतदानाची उत्साहात सांगता; शिवसेनेचे अमोल जाधव यांनी मतदारांचे मानले आभार

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज झालेली मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर लवकर हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. शहरातील तरुण मतदारांपासून ज्येष्ठ मतदारांपर्यंत सर्वच मतदारांनी लोकशाहीच्या सणात सक्रिय सहभाग नोंदवून आपले मतदानाचे हक्क बजावले.


मतदान केंद्रांवर पोलिस सुरक्षा आणि निवडणूक विभागाच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे दिवसभर कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या तर काही ठिकाणी कुटुंबांनी एकत्र येऊन मतदानाचा उत्साह अधिक वाढवला. तुळजापूरमध्ये आज संपूर्ण दिवस लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केली.


दरम्यान, तुळजापूर नगरपरिषदेसाठी शिवसेना पक्षाकडून एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी शहरातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “तुळजापूरकरांनी लोकशाहीचा मान राखत उत्साहाने मतदान केले. आमच्या उमेदवारांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही मतदारांचे ऋणी आहोत. तुळजापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू,” असे अमोल जाधव यांनी नमूद केले.


मतदान शांततेत होत असल्याने यंदाची निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित झाल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून तुळजापूरकरांना कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या