Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजपची आज भव्य दिव्य शक्ती-प्रदर्शन रॅली;शहरात राजकीय वातावरण तापले

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आज भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमुळे तुळजापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदाचे भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद पिंटू (भैया) गंगणे तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ ही ताकदवान रॅली आज सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे.


या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची उपस्थिती. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली ही रॅली मोठ्या जल्लोषात पार पडणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. रॅलीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता असून संपूर्ण शहरात निवडणूक वातावरण अधिक चुरशीचे झाले आहे.


रॅलीपूर्वी उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांनी तुळजापूरवासीयांना आवाहन करताना म्हटले आहे की—“आपण सर्वांनी या भव्य रॅलीला उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदानरूपी आशिर्वाद द्यावा. तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.


गंगणे यांनी शहरातील नागरिकांना रॅलीत सहभागी होण्याचे आणि भाजपच्या उमेदवारांना जिंकवून देण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.


राजकीय तज्ञांच्या मते, आजची भाजपची रॅली म्हणजे एक प्रकारे शक्ती-प्रदर्शन असून या रॅलीमुळे विरोधकांना घाम फुटण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक रॅलीत सहभागी होणार असल्याचे चित्र असून, यातून निवडणुकीतील वातावरण आणखी रंगणार आहे.


तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.


२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात तुळजापूरकर नेमका कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घालतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.


आजच्या रॅलीमुळे जनतेचा कोणत्या बाजूकडे कल आहे याची एक झलक पाहायला मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या