Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात सरपंचपद आरक्षण सोडतीसाठी दिनांक जाहीर – १० जुलै रोजी होणार प्रक्रिया

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन अधिसूचना (असाधारण क्र. २१३, दिनांक १३ जून २०२५) अन्वये मुंबई महाराष्ट्र ग्रामपंचायती (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील नियम २-अ च्या तरतुदीनुसार धाराशिव जिल्ह्यातील एकूण ६२१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.


जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या दिनांक ३ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार तालुकास्तरावर सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील एकूण १०८ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया गुरुवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजता पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर येथे पार पडणार आहे.


या कार्यक्रमात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय नागरिक, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी धाराशिव यांनी यासाठी अधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांना प्राधिकृत केले आहे. त्यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.


या प्रक्रियेसाठी सर्व संबंधित ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थ, जनप्रतिनिधी व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे.


ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भातील ही महत्त्वाची प्रक्रिया असून, त्यामध्ये पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी योग्य व योग्यतेच्या उमेदवारांची निवड सुनिश्चित करावी,असे आवाहनही तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या