प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने रायगडावर 9 जून 2025 रोजी (सोमवार) भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शिवबा राजे प्रतिष्ठान तुळजापूर यांच्यावतीने पंधराव्या वर्षीही एक आगळा-वेगळा उपक्रम पारंपरिक पद्धतीने राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिरातील श्रीकल्लोळतीर्थ व श्रीगोमुख तीर्थ या पवित्र कुंडांमधून विधिपूर्वक जलकुंभ भरून, आई तुळजाभवानीच्या चरणी त्याचे पूजन करण्यात आले. पूजेनंतर जलकुंभासह देवीची कवड्याची माळ व श्रीफळ घेऊन रायगडकडे मावळ्यांचा पवित्र जलसोहळा रवाना झाला.
या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजनकार्य पार पडले. यावेळी शिवबा राजे प्रतिष्ठानचे सदस्य व शिवभक्त – अर्जुन (आप्पा) साळूंके, विकास वाघमारे, नितीन जट्टे, सुरज साळूंके, राज शिंदे, कौस्तुभ ओवरीकर, सूर्या कदम, योगेश माळी, वैभव साळूंके आदी मावळे भक्तिभावाने उपस्थित होते.
हा जलकुंभ रायगडावर शिवराज्याभिषेक स्थळी नेऊन तेथे विधीवत अभिषेकासाठी वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या स्मृतींना पुनः एकदा उजाळा देण्याचा पवित्र उद्देश या उपक्रमामागे आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून या परंपरेचे जतन करणाऱ्या शिवबा राजे प्रतिष्ठानचा हा उपक्रम शिवप्रेम, श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडवतोय. रायगडाच्या दिशेने सुरू झालेल्या या धार्मिक यात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या