प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलावलेली कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून, त्यांनी कार्यकर्त्यांसमोर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात "ऑपरेशन टायगर" चर्चेचा विषय ठरला होता. खासदार ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे केवळ धाराशिव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना निर्णयाची माहिती दिली.
बैठकीत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी, "मी घेतलेल्या निर्णयासोबत कार्यकर्त्यांनीही माझ्यासोबत राहावे. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही," असे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांची साथ कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आधीच पक्षांतर्गत घडामोडींमुळे ठाकरे गट अडचणीत असताना आता अनेक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी पुनर्रचना होत असल्याचे दिसून येत आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयानंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एकमेकांविरोधात राजकीय भूमिका घेणारे नेते आता महायुतीच्या छत्राखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाची दिशा बदलणार का, की जुने मतभेद कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेनंतर धाराशिवसह राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची तारीख, त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडी आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर आगामी राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

0 टिप्पण्या