प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच बरखास्त झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अशातच शिवसेनेचे माजी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल (भैय्या) जाधव यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे तालुक्यात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
अमोल जाधव यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटस व फेसबुकवर एक प्रेरणादायी संदेशासह पोस्ट शेअर केली आहे. "वर्तमानात केलेले काम कधीच वाया जात नाही. आज घेतलेली मेहनत, केलेले प्रयत्न आणि जपलेली शिस्तच उद्याच्या यशाचा मजबूत पाया ठरते. कारण आजची कृतीच उद्याचे भविष्य घडवत असते," असा संदेश या पोस्टमध्ये देण्यात आला आहे.
जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर लगेचच आलेल्या या पोस्टमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक कार्यकर्ते आणि समर्थक या पोस्टकडे केवळ प्रेरणादायी संदेश म्हणून न पाहता, आगामी संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय संकेत म्हणूनही पाहत आहेत.
विशेष म्हणजे, तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक पुनर्बांधणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत अमोल जाधव यांचे नाव पुन्हा एकदा तालुक्याच्या नेतृत्वासाठी चर्चेत येत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपल्या कामाच्या बळावर आणि कार्यकर्त्यांमधील संपर्काच्या जोरावर पुन्हा एकदा तुळजापूर तालुक्याची धुरा सांभाळण्यास आपण तयार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश या पोस्टमधून दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मात्र, अमोल जाधव किंवा शिवसेना पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
आगामी काळात शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या आणि संघटनात्मक फेरबदलांमध्ये तुळजापूर तालुक्याचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमोल जाधव यांच्या या पोस्टमागे केवळ प्रेरणादायी संदेश आहे की आगामी राजकीय जबाबदारीची चाहूल, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

0 टिप्पण्या