प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारा निर्णय शिवसेना पक्षाने घेतला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाने जिल्हा संघटनेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.
शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी २२ जून २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना तसेच अंगीकृत संघटनांच्या सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नव्या संघटनात्मक बांधणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून सर्व पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर धाराशिवमधील शिवसेनेची राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीत कोणाला संधी मिळणार, कोणत्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आणि पक्षाची धुरा कोणाच्या हाती सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या संघटनात्मक फेरबदलात निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का, की नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना प्राधान्य दिले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
काही कार्यकर्त्यांनी अनौपचारिक चर्चेत नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत असून, आगामी काळात जुन्या कार्यकर्त्यांची भूमिका काय राहणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय हा केवळ संघटनात्मक बदल नसून आगामी पक्ष वाढीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नवी रणनीती असल्याचे मानले जात आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाची नवी रचना उभी राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


0 टिप्पण्या