Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्यक्ष वाघाचं दर्शन... आणि थेट रुग्णालयात दाखल!धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाची एंट्री?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाघाच्या वाढत्या हालचालींनी खळबळ उडवली आहे. येडशी अभयारण्यात स्थलांतरित झालेल्या टिपेश्वर येथील वाघाने आधीच दहशत माजवलेली असताना आता तुळजापूर व धाराशिव तालुक्यांतील विविध गावांमध्ये दुसऱ्या वाघाच्या उपस्थितीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे, तर वनविभागामध्येही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.


वाघ की बिबट्या? ठसे तपासणीवरून निर्माण झाला संभ्रम.!


नंदगाव, सलगरा (दि.), वडगाव देव, कार्ला (तुळजापूर) आणि सांगवी (धाराशिव) परिसरात वाघ दिसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र वनविभागाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून परस्परविरोधी माहिती दिली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सोशल मीडिया व्हिडिओच्या माहितीनुसार ते ठसे वाघाचे असल्याचे सांगितले गेले, तर काही वनअधिकाऱ्यांनी मात्र ते बिबट्याचे असल्याचे नमूद केले. ठसे वरिष्ठांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच नेमकी माहिती मिळणार आहे.

वाघ टिपेश्वरचाच की दुसरा नवा?


वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, सांगवी आणि नंदगाव परिसरात दिसलेला वाघ टिपेश्वर येथून स्थलांतरित झालेलाच आहे. मात्र बार्शी वनविभागाचे अधिकारी सांगतात की टिपेश्वरचा वाघ सध्या बार्शी तालुक्यातच आहे. त्यामुळे सध्याचा वाघ दुसरा असण्याची शक्यता बळावली आहे. या सगळ्या गोंधळामुळे वनविभागाचे अंतर्गत समन्वय आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


येडशी अभयारण्यात स्थायिक झालेला वाघ तुळजापूर तालुक्यात कसा गेला, यावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. या मार्गात नागरी व ग्रामीण वस्त्या तसेच दोन राष्ट्रीय महामार्ग येतात. ही हालचाल सहज शक्य नसल्याने वनविभाग माहिती लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांनी अधिकृत आणि स्पष्ट माहिती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


प्रत्यक्षदर्शी नागरिकचे घाबराटीतून प्रकृती बिघडली


१६ जून रोजी सांगवी शिवारात वाघ प्रत्यक्षदर्शी पाहिल्याचे भक्तराज दहीभाते या नागरिकाने सांगितले. वाघ पाहून ते इतके घाबरले की त्यांची प्रकृती बिघडून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचे समजते. त्यामुळे आरोग्य विभागाने समुपदेशन व उपचारासाठी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.


जागजी भागात शिकार; मॅनहिटर वाघाची भीती?


वाघाने सांगवी परिसरातून रेल्वे लाइन ओलांडून जागजी परिसरात प्रवेश केल्याचेही निदर्शनास आले आहे. काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्याने पाळीव प्राण्याची शिकार केली आहे. त्यामुळे तो मॅनहिटर (माणसांवर हल्ला करणारा) वाघ असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने योग्य उपाययोजना करणे आवश्यक ठरत आहे.


सामाजिक कार्यकर्त्यांचा कडक इशारा – अन्यथा आंदोलन


सध्या शेतीचे हंगाम सुरू असून शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात थांबत आहेत. वाघाचा धोका लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी चेतावणी दिली आहे की, जर वनविभागाने त्वरीत कारवाई केली नाही तर मागील काळात स्थगित केलेले आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा सुरू करण्यात येईल.


धाराशिव जिल्ह्यात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. वनविभागाने पारदर्शकता ठेवत, वाघ कोणता आहे, त्याची सध्याची स्थिती काय आहे, आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत याबाबत तातडीने खुलासा करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात संताप उसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या