प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात भव्य अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या भाविक व भक्तिभावपूर्ण सोहळ्याचे आयोजन तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीपूर्वी श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर उच्श्रृंखल भक्तिरसात भरलेली महाआरती करण्यात आली व फटाक्याची आतिषबाजी करून आलेल्या भाविक भक्तांना पेढ्याचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी नेतृत्वासाठी देवीचरणी प्रार्थना केली.
श्री तुळजाभवानी मातेकडे अशी प्रार्थना करण्यात आली की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, दिनदुबळे, कष्टकरी, गोरगरीब यांचे प्रश्न मार्गी लागो; तसेच भविष्यातही शेतकऱ्यांचे सरकार सत्तेवर येवो, अशी कामना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे,शेतकरी तालुकाध्यक्ष गणेश नेपते,नितीन मस्के,रवी काका पाठक,मोहन दादा भोसले,गौरव साळुंखे,संजय लोंढे,दुर्गेश कदम,रोहित भोसले,सचिन भोसले तसेच तालुक्यातील विविध भागांमधून आलेले शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सेनेचे सदस्य, तसेच शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण तुळजाभवानी परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघालेला दिसत होता.
कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आगामी रणनीती, लोकहिताची कार्ये आणि जनतेशी असलेला संपर्क यावर चर्चा केली.
शिवसेनेचा हा भक्तिपूर्ण उपक्रम, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करणारा ठरला असून, जनतेमध्येही सकारात्मक संदेश गेला आहे.
0 टिप्पण्या