Ticker

6/recent/ticker-posts

प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे यांचा सरकारला इशारा : सामाजिक, ओबीसी व अल्पसंख्याक विभागाचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेस वळवला तर तीव्र आंदोलन!

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे यांनी सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे की, सामाजिक न्याय विभाग, इतर मागासवर्ग (ओबीसी),आदिवासी विभाग आणि अल्पसंख्याक विभागाचा निधी जर पुन्हा ‘लाडकी बहिण योजना’साठी वळवण्यात आला, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


संजय नाना शितोळे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी सामाजिक विभागाच्या योजनांसाठी राखीव असलेला निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवण्यात आला होता. या निर्णयामुळे दलित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजात तीव्र नाराजी पसरली होती. हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, वसतिगृह सुविधा, कौशल्यविकास योजना आणि इतर उपक्रमांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.


"या घटनेने दलित समाजामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. सरकारने जाणीवपूर्वक हा निधी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही," असे सांगताना शितोळे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.


त्यांनी पुढे सांगितले की, “लाडकी बहिण योजना ही महिलांसाठी असलेली महत्त्वाची योजना आहे, त्याविरोधात आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, इतर सामाजिक गटांच्या विकासासाठी ठेवलेला निधी तिथून काढून तो लाडकी बहिण योजनेसाठी वापरणे ही अन्यायकारक बाब आहे. हा निधी मूळ उद्देशासाठी वापरला गेला पाहिजे.”


संजय नाना शितोळे यांनी सरकारला सूचित केले की, जर लाडकी बहिण योजनेसाठी इतर संवेदनशील विभागांचा निधी पुन्हा वळवण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. “ही केवळ चेतावणी नसून, गरज भासल्यास तीव्र कृतीत उतरू,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.


सरकारने या मुद्यावर लवकर निर्णय घेऊन सर्वसमावेशक धोरण राबवावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया रोजगार आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या