Ticker

6/recent/ticker-posts

जॉंबाज भारतीय सेनेच्या समर्थनार्थ शिवसेनेची तिरंगा रॅली; उद्या धाराशिवमध्ये होणार भव्य आयोजन


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव – शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या भारतीय सेनेने अलीकडेच देशाच्या सीमांवर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि देशातील एकता व अखंडतेच्या प्रतीकस्वरूप उद्या दि. ११ मे रोजी सकाळी ९ वाजता धाराशिव येथे शिवसेनेच्यावतीने भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.


ही रॅली राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यामध्ये महिलावर्ग, विद्यार्थी, युवक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांनी केले आहे.


भारतीय सेनेचा जबरदस्त प्रतिहल्ला – 'मिशन सिंदूर'

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या २६ निष्पाप भारतीय नागरिकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी क्रूर गोळीबार करत निर्घृण हत्या केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सेनेने ७ मे रोजी मध्यरात्री ‘मिशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवरील दहशतवादी ठिकाणांवर जबरदस्त मिसाईल हल्ला चढविला. या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक दहशतवादी अड्ड्यांचा नायनाट करण्यात आला असून, भारतीय सेनेने हवाई, जमिनी व समुद्रमार्गे जोरदार आक्रमण करत पाकिस्तानला तोंडघशी पाडले आहे.

रॅलीचा मार्ग व सहभाग

तिरंगा रॅलीची सुरुवात जिजाऊ चौक (बार्शी नाका) येथून होणार असून, ती लेडीज क्लब, शहर पोलीस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. रॅलीच्या समारोपस्थळी देशभक्तिपर भाषणांचा कार्यक्रम होणार आहे.


या रॅलीमध्ये आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील, दत्ता अण्णा साळुंके यांच्यासह विविध शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


हातात तिरंगा व भारत मातेची प्रतिमा घेऊन सहभागी व्हा!

ही रॅली केवळ एक मिरवणूक नसून, ती भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करणारा राष्ट्रभक्तीचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या हातात तिरंगा व भारत मातेची प्रतिमा घेऊन राष्ट्रासाठी एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या