प्रतिनिधी : प्रविण मोरे
पुणे : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन पुण्यातील रुआक फेलोशिप चर्च यांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेवर प्रकाश टाकत, सर्व धर्मांमध्ये एकता, सौहार्द, शांती आणि परस्पर आदर यांचा संदेश देण्यात आला.
या विशेष कार्यक्रमात देवाच्या संपूर्ण जगावरील निःस्वार्थ प्रेमाचा संदेश मांडण्यात आला. “देवाने जगावर इतके प्रेम केले” या बायबलमधील सत्यावर आधारित विचार उपस्थितांपुढे ठेवण्यात आले. या संदेशातून प्रेम, करुणा आणि मानवतेच्या मूल्यांवर भर देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी स्पष्ट केले की येशू ख्रिस्त धर्म परिवर्तनासाठी नव्हे, तर प्रेम, आनंद, शांती आणि समजूतदारपणा पसरवण्यासाठी आला होता. कोणत्याही धर्माचा अपमान न करता, सर्व धर्मांचा सन्मान राखत एकमेकांशी प्रेमाने वागणे हाच खरा विश्वास असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
रुआक फेलोशिप चर्चने या उत्सवाद्वारे सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचे महत्त्व पटवून दिले. येशू भारतावर प्रेम करतो आणि प्रेम, एकता व शांततेच्या मार्गानेच देश प्रगती करू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि चर्चचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून समाजात परस्पर आदर, विश्वास आणि प्रेम वाढीस लागते. आपण सर्वांनी एकत्र येऊन असे उत्सव साजरे करावेत आणि समाजात प्रेम व एकतेची भावना अधिक बळकट करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

0 टिप्पण्या