प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये यशवंत सेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतोले यांनी केले आहे.
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटासाठी यशवंत सेनेचे पाच उमेदवार तर पंचायत समिती गणासाठी सहा उमेदवार निवडणूक लढवत असून, तालुक्यात नूतनच प्रवेश केलेल्या यशवंत सेनेने अल्पावधीतच प्रचारामध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे. अनेक ठिकाणी यशवंत सेनेच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, काही उमेदवार हे विजयाच्या वाटचालीवर असल्याचे संकेत मिळत असल्याचे मत बाळासाहेब दोडतोले यांनी व्यक्त केले.
यशवंत सेनेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जाणार असून, सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत.मतदारांनी सर्व ११ उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाची संधी द्यावी, असे आवाहनही दोडतोले यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात
सिंदफळ गटातून पूजा अजित क्षीरसागर,
मंगरूळ गटातून नीता विकास जाधव,
काडगाव गटातून सतीश मच्छिंद्र माळी,
नंदगाव गटातून अंकुश अरुण रुपनूर,
जळकोट गटातून अनिता गणेश लष्करे
हे उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.
तसेच पंचायत समिती गणामध्ये
सिंदफळ गणातून तनुजा गणेश व्यवहारे,
अपसिंगा गणातून आनंदाबाई गोरख सोनवणे,
शहापूर गणातून तस्लीम लियाकत मुलानी,
सावरगाव गणातून राजकुमार मारुती बोबडे,
हर्टी गणातून शीतल शहाजी हाके,
नंदगाव गणातून अनिता पांडुरंग शिंदे
हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
हे सर्व उमेदवार अहोरात्र मतदार बांधवांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून, त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांनी केले आहे.
दरम्यान, येणाऱ्या काळात यशवंत सेनेचे किती उमेदवार विजयी होतात आणि कोणत्या राजकीय पक्षाला यशवंत सेना डोकेदुखी ठरते, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

0 टिप्पण्या