प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : आठवडा बाजार येथे पारधी समाजातील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. मात्र ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना तीव्र गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीची माहिती मिळताच नगराध्यक्ष विनोद पिटू भैय्या गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत राहुल दादा भोसले यांच्या वतीने तात्काळ मोफत पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली.
भाविकांची वाढती गर्दी आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची ठरली होती. अशा वेळी वेळ न दवडता पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात आल्याने पारधी समाजातील भाविकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे दर्शनासाठी आलेल्या लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांची मोठी गैरसोय टळली.
या वेळी स्थानिक नागरिकांनीही या तत्पर सेवाभावी कार्याचे कौतुक केले. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करत मानवतेचे दर्शन घडविल्याबद्दल नगराध्यक्ष विनोद गंगणे व राहुल दादा भोसले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरील विश्वास अधिक दृढ होत असून, भविष्यातही अशाच लोकहिताच्या कार्यातून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या