Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरात जिल्हा परिषद शाळेच्या जागेत ‘उमेद मॉल’ उभारणार;आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आधुनिक ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात आधुनिक सुविधा, खरेदी व्यवस्था, विश्रांतीसाठी आवश्यक सोयींचा अभाव जाणवत होता. ही गरज ओळखून जिल्हा परिषद शाळेच्या उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


उमेद मॉल उभारल्यानंतर शहरातील व्यापारी, स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खरेदी, भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. यामुळे तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास होऊन शहराचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या मॉलमध्ये आधुनिक दुकान संकुले, फूड कोर्ट, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच पर्यटनास पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकल्प राबविताना स्थानिक नागरिकांच्या हिताचा प्राधान्याने विचार केला जाईल आणि कोणालाही अन्याय होणार नाही, याची ग्वाहीही आमदार पाटील यांनी दिली.


या पत्रकार परिषदेला स्थानिक पदाधिकारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. उमेद मॉलच्या माध्यमातून तुळजापूर शहर विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या