Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिवच्या सत्ता समीकरणांना वेग?आ.तानाजी सावंत यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई : धाराशिव जिल्हा परिषदेमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना सध्या वेग आला असून महायुतीकडून जोरदार जुळवाजुळव सुरू आहे.अशातच माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.


धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीकडे संख्याबळ असले तरी अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून अध्यक्षपदासाठी दावा केल्याने अशा परिस्थितीत आ.तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.


सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात.जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचा उमेदवार बसवण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भेटीनंतर सावंत यांनी माध्यमांशी औपचारिक प्रतिक्रिया दिली नसली तरी, शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्यासाठी ते सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत.


दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखत सत्ता स्थापनेसाठी अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.अध्यक्षपदासोबतच सभापतीपद आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबतही तोडगा निघणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचा निर्णय पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार असून, सावंत–शिंदे भेटीनंतर राजकीय समीकरणांना नवा वेग मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या