प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विविध कामांसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली असताना तुळजापूर तहसील कार्यालयात महसूल, पुरवठा व इतर विभागांचे अधिकारीच अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कार्यालय सुरू असतानाही संबंधित अधिकारी कामाच्या वेळेत हजर नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
तहसील कार्यालयात दाखल झालेले नागरिक जमिनीचे उतारे, दाखले, नामांतरण, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र, तसेच रेशनिंगसंदर्भातील विविध कामांसाठी आले होते. मात्र संबंधित कक्षांमध्ये अधिकारी नसल्याने कामे ठप्प पडली. काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत “कार्यालय सुरू असताना अधिकारीच नसतील तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, महसूल अव्वल कारकून यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. अचानक सर्व अधिकारी एकाच वेळी अनुपस्थित का होते, ते नेमके कुठे गेले होते, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.
या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी प्रशासनावर टीका केली. “तहसील कार्यालयातील अधिकारी नेमके कोणाच्या आशीर्वादाने कामाच्या वेळेत गायब झाले? याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
तहसील कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय गरजांचे प्रमुख केंद्र आहे. अशा ठिकाणी अधिकारी अनुपस्थित राहिल्यास नागरिकांचा शासनावरचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी व दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका काय येते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या