Ticker

6/recent/ticker-posts

शिराढोण येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्र्यांना निवेदन; नागरिकांना दिलासा देण्याची मागणी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

कळंब:शिराढोण (ता. कळंब जि. धाराशिव) शिराढोण व परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.


सध्या महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी शिराढोण व परिसरातील नागरिकांना कळंब तहसील कार्यालयात जावे लागत आहे. जात, उत्पन्न, निवासी दाखले, फेरफार, जमीन नोंदी, पीकपेरणी नोंद, आपत्ती अनुदान यांसारख्या कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वेळेचा व पैशाचा मोठा अपव्यय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


शिराढोण हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील अनेक गावांना थेट फायदा होणार आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होईल तसेच नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


या निवेदनावेळी अल्पसंख्यांक मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई हाशमी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शाहनूर बागवान, कळंब तालुका अध्यक्ष सय्यद रफिक, मतिन शेख, चांद शेख, मुनीर पठाण, जावेद सय्यद, मुनीर सय्यद तसेच दादा खतीब उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांकडे सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.


महसूल मंत्री बावनकुळे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाकडून प्रस्तावाचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.


परिसरातील नागरिकांनी या मागणीचे स्वागत केले असून लवकरात लवकर अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या