प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आता जोरदार राजकीय वेग निर्माण झाला असून भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तासमीकरणांवरून चुरस वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल १५ सदस्य निवडून आल्यामुळे अध्यक्षपदाच्या निर्णयात शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विशेषतः भूम, परंडा आणि वाशी या मतदारसंघांमध्ये आ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या भागांतून ८ जिल्हा परिषद सदस्य विजयी करून सावंत यांनी थेट अध्यक्षपदाच्या शर्यतीत दमदार एंट्री केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत मागणीही केली आहे.
दरम्यान, भाजपकडून अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद शिवसेनेकडेच असावे, या भूमिकेवर आ.तानाजी सावंत ठाम असल्याचे समजते. त्यामुळे सत्तेच्या वाटाघाटींमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगली आहे की,आ. तानाजी सावंत यांच्या गटाला बाजूला ठेवून भाजप आपला अध्यक्ष बनवण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले, तर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता प्रश्न असा आहे —
🔹आ. तानाजी सावंत यांचा गट सत्तेत सहभागी होणार का?
🔹 की भाजप सावंतांना सत्तेबाहेर ठेवून स्वतःचा अध्यक्ष बसवणार?
धाराशिव जिल्ह्याचे राजकारण सध्या तापले असून पुढील काही दिवसांत होणारे राजकीय घडामोडी निर्णायक ठरणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी सुरू झालेला हा सत्तासंग्राम कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या