प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. यात महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतील भाविकांचा समावेश असतो. याच पार्श्वभूमीवर, दिनांक ७ जून २०२५ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या वतीने एक जाहीर आवाहन करण्यात आले होते, ज्यामध्ये “सध्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने” दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या जाहीर आवाहनानंतर आता शिवसेना तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापकांकडे अधिकृत खुलासा मागितला आहे. त्यांनी लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आपल्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या या आवाहनाचा आधार काय आहे? कोरोना नव्या व्हेरिएंटचा कोणता प्रकार सध्या तुळजापूर परिसरात आढळून आला आहे? व त्यासंदर्भातील वैद्यकीय अधिनियमाअंतर्गत अधिकृत आदेश, मेडिकल जर्नल व संशोधित अभिलेखांची प्रती उपलब्ध करून द्यावी.”
चिवचिवे यांनी यासोबतच असेही नमूद केले आहे की, भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार कोणतीही अधिकृत सार्वजनिक माहिती ही दस्तऐवजी स्वरूपात पुरविणे अनिवार्य आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने केवळ सोशल मीडियावर किंवा माईकवर सूचना देण्याऐवजी, त्यामागे कोणते अधिकृत शासकीय आदेश, संदर्भ अथवा आरोग्य विभागाची अधिसूचना आहे, ती जाहीर करावी.
या मागणीमुळे मंदिर प्रशासनासमोर आता पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत उत्तर दिले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, तुळजापूर हे धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असून येथे आलेले कोणतेही निर्णय लाखो भाविकांच्या दैनंदिन भक्तीशी निगडित असतात. त्यामुळे याबाबतीत प्रशासनाने सुस्पष्ट भूमिका घ्यावी, अशीही मागणी होत आहे.
या निवेदनावर तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव,नितीन मस्के,गौरव साळुंखे,टिनू कदम,विक्रम कदम,तात्या क्षीरसागर,परिक्षित साळुंखे तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या