Ticker

6/recent/ticker-posts

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा;भूमी अभिलेख लिपिक 2000 रुपये घेताना पकडले.!


प्रतिनिधी : जुबेर शेख 

वाशी : धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाने शेतजमिनीच्या कायम मोजणीसाठी लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्या पथकाने आज दिनांक 27 मे 2025 रोजी केलेल्या सापळा कारवाईत आरोपी लिपिक दिगंबर मारुती ढोले (वय 45 वर्षे) याला 2000/- रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.


55 वर्षीय तक्रारदाराने आपल्या आईच्या नावे असलेल्या गट क्रमांक 444 मधील शेतजमिनीची कायम मोजणी करून घेण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज केला होता. दिनांक 07 मे 2025 रोजी शेतजमिनीची मोजणी झाल्यानंतर, लिपिक दिगंबर ढोले यांनी हद्द कायम खुणा करण्यासाठी 3000/- रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने 23 मे 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे केली होती.


दिनांक 26 मे 2025 रोजी लाच मागणीची पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपीने लाच स्वीकारण्याचे कबूल केले व 2000/- रुपये लाच रक्कम घेण्याचे मान्य करून तक्रारदारास ती रक्कम 27 मे रोजी आणण्यास सांगितले.


नियोजित सापळा कारवाई दरम्यान, दिगंबर ढोले याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून 2000/- रुपये स्वीकारले व त्याच क्षणी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून 2000/- रुपये व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.


आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीची घरझडती सुरु असून, मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे.


सापळा अधिकारी: श्री. विकास राठोड, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव


सापळा पर्यवेक्षण अधिकारी: श्री. सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव


मार्गदर्शक अधिकारी:


श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर (मो. 9923023361)


श्री. मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर (मो. 9881460103)



सापळा पथकातील अधिकारी व कर्मचारी: पो. ना. आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी, चालक दत्तात्रय करडे



कोणतीही लाच मागणी झाल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी!


टोल फ्री क्रमांक: 1064


पोलीस अधीक्षक (लाप्रवि, छत्रपती संभाजीनगर): 9923023361


पोलीस उप-अधीक्षक (धाराशिव): 9594658686

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या