प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर – शहरात अलीकडेच उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तत्काळ कारवाई करत जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
तर, तुळजापूर पोलीस ठाण्यासाठी नवीन प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून अण्णासाहेब मांजरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे शहरातील नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचा अधिक विश्वास वाटेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ड्रग्स प्रकरणावर कठोर कारवाई करण्याच्या हेतूने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, नवीन नियुक्त अधिकारी तातडीने कार्यभार स्वीकारून पुढील कारवाई करतील,असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.
0 टिप्पण्या