उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रूपेश डोलारे
उस्मानाबाद: मुंबई येथील शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांसाठी तुळजाभवानी एक्सप्रेस ( क्र . ००१८० ) रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवारी ( दि. ४ ) रोजी रात्री १ वाजता उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांनी रेल्वे स्टेशन उस्मानाबाद येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे - पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपुर्वी घडलेल्या राजकीय गदारोळांमुळे राज्यातील असंख्य निष्ठावान शिवसैनिकांसह,नागरीकांना दसरा मेळाव्याची प्रतिक्षा लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार आत्मसात करण्यासाठी राज्यातील शिवसैनिक आणि नागरिक उत्सुक आहेत. पक्षाच्या विचारांशी आणि पक्षाने मोठे केलेल्या पक्षनेतृत्वाशी प्रतारणा करून पक्षाला सोडून गेलेल्यांनी दसरा मेळाव्याचे मैदान देखील शिवसेनेला मिळू नये म्हणून प्रयत्न केले.
उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवातीर्थवरच होईल असा निकाल दिला आणि शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा अखंडीत सुरु राहण्याचा मार्ग सुकर झाला. हा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने स्वाभिमान,निष्ठा,संघर्ष आणि त्यागाचे प्रतिक असल्याचे सांगून या दसरा मेळाव्यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येण्याचे आवाहन खा.ओम राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या