Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजापूर शहरात बकरी ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि बंधुभावाच्या संदेशासह साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील ईदगाह मैदान येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी उपस्थित होते.


यावेळी नमाजपूर्वी ईदगाह मैदान येथे मौलाना गुलाम रजा यांनी उपस्थितांना बकरी ईदचे धार्मिक महत्त्व सांगितले. त्यांनी त्याग, श्रद्धा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत समाजात शांतता व ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.


त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता जामा मस्जिद येथील मौलाना समीर यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज अदा करण्यात आली. नमाजानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


दुवा करताना मौलाना समीर यांनी देशावर येणारी सर्व संकटे दूर व्हावीत, भारतात सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी शांततेत, आनंदात व सुखरूप राहावे तसेच देशात बंधुभाव आणि एकात्मता कायम राहावी, अशी प्रार्थना केली.


बकरी ईद निमित्त शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले. नागरिकांनीही एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद उत्साहात साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या